चॉपरने वार करत तरुणाचा खून ,वाचविण्यासाठी आलेल्या भावासह तरुण जखमी

जळगाव :  चॉपरने वार करुन तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवार, 10 रोजी शहरातील समतानगरात घडली. अरूण बळीराम सोनवणे (28) रा.समतानगर असे मृत तरुणाचे नाव आहे. मृताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे तसेच आशिष संजय सोनवणे हे दोघांवरही हल्लेखोरांनी हत्याराने वार करत जखमी केले.

प्राप्त माहितीनुसार, जुन्या वादातून रविवारी सकाळी अरुण सोनवणे याचा काही तरुणांशी समतानगर येथे  वाद झाला. स्थानिक लोकांच्या पुढाकाराने हा  वाद मिटविण्यात आला. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमाराम संशयित तरुणांनी अरुण सोनवणे याला  समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलावले. याठिकाणी हल्लेखोरांनी अरुण याच्यावर चॉपर तसेच कोयत्याने  सपासप वार केले. अरुण याने वाचण्याचा प्रयत्न केला,मात्र हल्लेखोरांनी  त्याच्या गळ्यावर,छातीवर, मानेवर  तिक्ष्ण हत्याराने वार केले. अरुण हा रक्ताच्या थारोळ्यात  पडला.

धावून आलेल्या दोघांनाही केले जखमी

अरुण हा वंजारी टेकडीकडे गेल्याचे कळताच त्याचा भाऊ गोकुळ तसेच साथीदार आशिष सोनवणे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. दोघे दिसताच हल्लेखोरांनी वार करुन दोघांना गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता येथे बेशुध्दावस्थेतील अरुण याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. नातेवाईकांसह तरुणांनी येथे गर्दी केली. रामानंदनगर तसेच जिल्हापेठ पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. एलसीबीचे पथकही दाखल झाले. घटनाक्रम जाणून घेत संशयितांच्या शोध घेण्याकामी पथके रवाना करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

समतानगरात सन्नाटा

सकाळी पूर्व वादावरुन भांडण झाल्याने समतानगर भयभीत झाले. वाद मिटल्याने पुन्हा ही भीती दूर झाली. परंतु दुपारी तिघां तरुणावर प्राणघातक हल्लेच्या घटनेने समतानगरात सन्नाटा निर्माण झाला. तर रुग्णालयात अरुण याला मृत घोषित केल्यानंतर याठिकाणी तणावाचे वातावरण दिसले. समतानगरातील नागरिक भितीनेही ग्रस्त झाल्याचे संध्याकाळी दिसले.याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.