चोपडा । महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या काही केल्या थांबत नसून अशातच चोपडा तालुक्यात हादरवून सोडणार अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावातील तरूणीवर चार जणांनी अत्याचार केला. याबाबत पिडीत तरूणीने पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. त्यानुसार या प्रकरणी संशयित चार नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील एका गावात गफूर गबू तडवी (३३) याने २ जानेवारी रोजी दुपारी तरुणीच्या घरात घुसून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये; नाहीतर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतीक राजेंद्र कोळी (२०), पंकज बुधा कुंभार (२६) व अमोल शत्रुघ्न कोळी (२३) या तीन जणांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली.
नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला. ४ जानेवारी रोजी रात्री १२ ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकारानंतर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.