चोपड्यात ६० लाखांचा गुटका जप्त. पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव(चोपडा):  मध्य प्रदेशातून गुटखा भरून ट्रक चोपडा मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती ‘आयजी’च्या पथकाला मिळाल्याने गुटखा भरलेल्या ट्रकचा पाठलाग करून अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील अकुलखेडा गावाजवळ संशयित ट्रक पकडून साठ लाखाचा गुटखा जप्त केला.या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे .

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना सोमवारी (ता. २९) सकाळी मध्य प्रदेशातून आयशर ट्रक (क्रमांक एमएच-१९, सीवाय ६९७२) यात गुटखा भरून चोपडा शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती रविवारी रात्री मिळाली होती.या माहितीवरून ‘आयजी’ पथकाच्या कर्मचाऱ्यांना ट्रक येत असताना दिसताचा त्या ट्रकचा पाठलाग करून अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावरील शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील अकुलखेडा गावाजवळील चावरा इंटरनॅशनल स्कूलसमोर ट्रकच्या पुढे पथकाने खासगी स्विफ्ट डिझायर गाडी आडवी करून संशयित असलेला ट्रक थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यात गुटखा भरलेला आढळून आला.

या वेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावळे, सहाय्यक निरीक्षक अजित सावळे, पोलिस कर्मचारी विलेश सोनवणे, शेषराव तोरे, संतोष पारधी, संदीप भोई, रवींद्र पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर गुटखा भरलेला ट्रक शहर पोलिस ठाण्यात आणून त्यातील ४९ लाखांचा गुटखा, दहा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि तीस हजार किमतीचे चार मोबाईल असा एकूण ५९ लाख ४६ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन चालक, क्लिनरसह एक जण असे तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.