जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, वाहनधारकांत भिती निर्माण झाली आहे. पाचोरा तालुक्यात व्यावसायिकाला मारहाण करुन कार पळवून नेली. चाळीसगावात घरासमोरुन कार लांबविली. जळगाव शहरात खासगी हॉस्पिटलसमोरुन चोरट्यांनी दुचाकी नेली. या प्रकरणी विविध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
अरुण बाबुलाल जाधव हे भोजे ता.पाचोरा येथील र हिवासी असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त त्यांच्या मालकीची कार क्रमांक एमएच 19 ईअे 3494 ने जळगाव येथे गेले. काम आटोपून सायंकाळी ते भोज गावी जाण्यासाठी कारने निघाले. पाचोरा तालुक्यातील साजगाव शिवारातून रस्त्याने त्यांची कार धावत असताना पल्सर तसेच प्लॅटीना अशा दोन दुचाकीने चौघे अनोळखी आले. त्यांनी कारपुढे दुचाकी आडवी करत कार थांबविली. अरुण जाधव यांना कारमधून त्यांनी बाहेर ओढले. त्यांना शिवीगाळ करत चापटा बुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कार घेवून चोरटे पळाले. हा थरार 31 रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला.
6 लाख किमतीची कार, 20 हजार किमतीचा लॅपटॉप तसेच 10 हजार किमतीचा मोबाइल असा मुद्देमाल चोरट्यांनी जबरीने लुटून नेला. तक्रारीवरुन सोमवार 5 रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोहवा सचिन निकम करत आहेत.
घरासमोरुन पळविली कार
चाळीसगाव शहरात खरजाईनाका जगन आप्पा टॉवर परिसरात रविवार 4 रोजी संध्याकाळी क्रमांक एमएच 19 सीएफ 3888 ही कार घरासमोर पार्किंग केली होती. रात्री चोरट्यांनी दरवाजा उघडत ही कार सुरु करुन चोरुन नेली. सोमवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कार चालक दीपक सुखदेव पगार रा.चाळीसगाव यांनी तक्रार दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 5 लाख किमतीची कार चोरी प्रकरणी गुन्हा 5 रोजी दाखल झाला. तपास पोहेकॉ राहूल सोनवणे करत आहेत.
हॉस्पिटलसमोरुन दुचाकीची चोरी
निवृत्ती गजानन सोनवणे (वय 32) हे वाकटुकी ता. धरणगाव येथे वास्तव्यास आहेत. शेती करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जळगाव येथे उपचारासाठी नातेवाईक दाखल झाल्याने ते गुरुवारी 1 रोजी रात्री 9.30 वाजता त्यांच्या मालकीची क्रमांक एमएच 19 डीएन 2272 ने खडके हॉस्पिटल येथे आले. दुचाकी लॉक करुन ते खडके हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. त्यानंतर चोरट्याने लॉक तोडत दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार शनिवार 3 रोजी उघडकीस आला. या प्रकरणी सोमवार 5 रोजी गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला. तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करत आहेत.