जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज लहान मोठ्या घटना समोर येत आहेत. अमळनेर बसस्थानक येथून बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची मंगलपोतसह चांदीची चैन असा एकुण ३८ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शनिवार, १७ रोजी सायंकाळी ६ वाजता कडगाव नाक्याजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील सासर असलेल्या सलोनी उर्फ वैशाली प्रशांत पाटील या विवाहिता माहेराहून सासरी जाण्यासाठी शनिवार, १७ रोजी सायंकाळी अमळनेर बसस्थानकातून बसमध्ये प्रवास करत होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून मंगलपोत आणि चांदीची चैन असा एकुण ३८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार सायंकाळी ६ वाजता कडगाव नाक्याजवळून प्रवास करत असताना लक्षात आला. त्यांनी बस थांबवत सर्व शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री ८.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.