जळगाव : शहरात कुलुंप बंद घर तसेच दुचाकी लांबविण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव दिसत आहे. एकाच ठिकाणावरुन चोरट्यांनी चार तर जिल्हापेठ तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा सहा दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या. कैलास सुरेश सोनार (39) हे बालाजीपेठ येथे वास्तव्यास असून ते मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार 11 रोजी संध्याकाळी ते त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच 19 बीपी 9599 ने शहरात आले. निलम वाईन शॉप समोर सार्वजनिक जागेवर दुचाकी लावून ते कामाला गेले. रात्री 8 वाजता ते दुचाकी घेण्यासाठी आले असता त्यांची दुचाकी चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करत आहेत.
पार्किंगमधून एसटी कर्मचाऱ्यांची दुचाकी लंपास
महेश नामदेव मोरे (47) हे नवीन जोशी पेठ येथे कुटुंबासह वास्तव्यास असून ए.टी.महामंडळात कार्यरत आहेत.ते शनिवार 2 रोजी सकाळी त्यांच्या मालकीची सुमारे 30 हजार किमतीची दुचाकी क्रमांक एमएच 19 यू 0702 ने ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले. त्यांनी सकाळी 9 वाजता नवीन एस.टी. बस स्टॅन्डचे जलमंदीराजवळ पार्किंगमध्ये दुचाकी लावली. त्यानंतर ते कामावर निघाले. दुपारी दीड वाजता ते दुचाकी घेण्यासाठी आले असता दुचाकी आढळली नाही. दुचाकीचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मिळाली नाही. याप्रकरणी तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोना कमलेश पवार करत आहेत.
भाविकांची दुचाकी घेत चोरटे पसार
जळगाव कानळदा रोडवर आव्हाणे शिवारात हायवे बायपासवरील उड्डानपुलाजवळील गोडावूनच्या परिसरात भाविकांनी रविवार 10 रोजी सकाळी 10.30 दुचाकी पार्किंग केल्या. ते बडे जटेधारी महादेवव मंदिर परिसरात कथेत बसले. सायंकाळी 6 वाजता ते आले असता चार दुचाकी गायब झाल्याचा प्रकार समोर आला. अरुण रामचंद्र निकुंभ (58) जीवनमाता कॉलनी मोहाडी रोड , प्रवीण नगराज बिडवे (रा. अचंडगाव ता.भडगाव), दिनेश विठ्ठल सोनवणे( वडनगरी ता.जळगाव), सुधाकर गणपत बडगुजर (रा. पिंपळगाव हरे.) यांच्या दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या.
अशा होत्या दुचाकी
30 हजार किमतीची होंडा शाईन क्रं.एमएच 19 सीक्यू 2041, 20 हजाराची हिरो स्प्लेंडर एमएच 19 डिजे 3116, 20 हजार किमतीची हिरो स्प्लेंडर एमएच 19 बीके 5669, 20 हजार किमतीची डिस्कव्हर क्र. जीजे 05 एचबी 0692 या दुचाकी चोरुन नेल्या. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोना गुलाब माळी करत आहेत.