छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्प अद्वितीय होते. आजच्या आधुनिक युगामध्ये लाखो विद्यार्थी मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन शास्त्र शिकतात, परंतु भारतासाठी हे शास्त्र नवीन नाही. आमच्या देशातील थोर राजनीतिज्ञ, राज्यकर्ते अशा अनेकानेक लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये मोठमोठी कामे यशस्वी करण्यासाठी या शास्त्राचा उपयोग केला होता, हे आज सप्रमाण सिद्ध झालेले आहे.
१९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्रजी दिनदरिकिनुसार जन्मतारीख होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन बघितले तर आम्हाला त्यांच्याही जीवनामध्ये व्यवस्थापन कौशल्याचे अनेकानेक नमुने पाहायला मिळतात. आजचे आधुनिक व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांना जे शिकवते त्यामध्ये ‘प्लॅनिंग’ म्हणजे योजना करणे, ऑर्गनायझिंग’ म्हणजे संघटित करणे एकत्रित करणे, ‘स्टाफिंग’ म्हणजे प्रत्येक कामासाठी माणूस आणि माणसासाठी काम, ‘को-ऑर्डिनेशन’ म्हणजे सुसूत्रपणा, ‘डायरेक्टिंग’ म्हणजे दिशानिर्देशन, ‘कंट्रोलिंग’ म्हणजे नियंत्रण, ‘मोटिव्हेशन’ म्हणजे कार्य करण्यास आवश्यक ती प्रेरणा, ‘रिझल्ट ओरिएंटेड नेस’ म्हणजे कार्याचा अनुकूल परिणाम प्राप्त करणे अशा अनेक गोष्टी शिकविल्या जातात, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा बीमोड करण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने अफजल खान नावाच्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी सरदाराला पाठविले होते, त्यावेळेस महाराजांनीसुद्धा गावातील वतनदार, देशमुख, देशपांडे यांना स्वराज्याकरिता लढण्याचे आवाहन केले.
त्यावेळेस स्वराज्य नावाची काही गोष्ट अस्तित्वात नव्हती. जी काही होती ती फक्त एक सुरुवात होती. हिंदवी स्वराज्य हा ‘कन्सेप्ट’ होता म्हणजे एक विचारांमध्ये अस्तित्वात असलेली गोष्ट होती. परंतु महाराजांनी ही कल्पना आपत्या सोबतच्या सवंगड्यांमध्ये मांडली व या संकल्पनेसाठी लोकांना त्यांनी एकत्रित केले. एखाद्या अशक्य गोष्टीसाठी लोकांनी एकत्र येणे यात महाराजांचे ‘मोटिव्हेशन स्किल’ म्हणजे इतरांना प्रेरणा देण्याचे कौशल्य दिसून येते.
विजापूरच्या आदिलशहाने तर सर्वांना खलिते धाडले होते की, बादशाही फौजेमध्ये सामील व्हा अन्यथा कुटुंब कबिल्यासह कापते जाल. एवढी मोठी धमकी लोकांना मिळालेली होती, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा कौशल्य इतके अप्रतिम होते की, लोक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायलासुद्धा तयार झाले. कोणाकडे पाचशेची फौज, कोणाकडे हजाराची अशा छोट्या छोट्या फौजा महाराजांनी एकत्रित केल्या व सर्वाना एकत्र करून अफजल खानाची स्वारी ज्यावेळेला झाली त्यावेळेस लढण्यासाठी सगळ्यांना सिद्ध केले, अफजल खानाने पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर भन केले, तुळजापूरची भवानी मातेची मूर्ती भग्न केली.
त्याचा उद्देश हाच होता की, या सर्व प्रकारांमुळे प्रजेचा शिवाजी महाराजांवरचा विश्वास डळमळीत होईल आणि हे लोक शाही फौजेला येऊन मिळतील आणि शेवटी शिवाजी हा भर मैदानात आपल्याशी लढण्यासाठी येईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे पण आपले व्यवस्थापन कौशल्य वापरले. त्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला, परंतु लढाईसाठी जे क्षेत्र, जे मैदान, जी जागा हवी होती ती त्यांनी स्वतःच्या हिशोबाने निवडली. महाराजांनी त्यांच्या प्रमुख सरदारांची बैठक घेतली व त्यांना विचारले की, अफजल खानाच्या संकटाशी कसे तोंड दिले पाहिजे? त्या वेळेला सर्वांनी त्यांना एकस्वरात सांगितले की, आपण अफजल खानाची लढाई करू शकत नाही: आपण त्याच्याशी तह केला पाहिजे.
महाराजांनी सर्वांचे बोलणे ऐकून घेतले आणि ते ऐकून घेतल्यावर त्यांनी अंतिम निर्णय स्वतःचा दिला आणि तो म्हणजे तह केल्याने जीव जाईल, लढा दिल्याने विजयाची शक्यता राहील. याला म्हणतात ‘लीडरशिप क्वालिटी’ किंवा नेतृत्व क्षमता, जरीही तुमच्या सोबत्यांनी एखादे मत दिले असेल तरीसुद्धा समूहाला कोणत्या दिशेने न्यायचे हे नेत्याने ठरवायचे असते. नेहमीच ‘मेजॉरिटी इज द लॉ म्हणजे बहुमत जिकडे असेल तोच न्याय असे होत नाही तर नेत्याने काय बरोबर आहे तेही बघितले पाहिजे. एखाद्या गोष्टीचे दूरगामी परिणाम काय होईल, याचाही त्याने विचार केला.
पाहिजे. महाराजांनी अगदी हेच केले आणि त्यांनी सर्वाना आपला निर्णय सांगितला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाला भेटायला जाणार होते त्यावेळेस त्या भेटीच्या दरम्यान कुठलाही घातपात होऊ शकतो. आपल्या जिवाला बरे-वाईट होऊ शकते, याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे जर भेटीचा निकाल आपल्या विरोधात लागला तर काय करायचे यावी तजवीज महाराजांनी करून ठेवली होती, त्यांनी आपल्या सवंगड्यांना सांगितले की, माझे काही बरे-वाईट झाल्यास शंभुराजांना गादीवर बसवा व स्वराज्याचे काम याच निष्ठेने तुम्ही सुरू ठेवा. आपण गेल्यानंतर काम सुरू राहिले पाहिजे यासाठी केले गेलेले हे ‘सक्सेशन प्लॅनिंग’ आहे. म्हणजे आपले कार्य पुढे कोण सुरू ठेवणार, त्याची नेमणूक करून ठेवणे हे पण नेतृत्वाचे काम आहे. वेगवेगळ्या वेळेस उत्तम कामगिरी करणाऱ्या सैनिकांना, सरदारांना महाराजांनी कधी पदोन्नती दिली तर कधी इनाम दिले. ही पदोन्नती किंवा इनाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘रिवार्ड अॅण्ड रिकग्निशन’ आहे.
गड चढायचा प्रयत्न करणान्यांना कोण रोखेल, पळणाऱ्यांना कोण पाडेल. शस्त्र सोडून पळणाऱ्यांचे शस्त्र आणि युद्ध सामग्री कोण जमा करेल, अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या महाराजांनी आखून व वाटून दिल्या होत्या. ‘डिलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी’ ज्याला म्हणतात ते हेच आहे. अफजल खान मारला गेल्यानंतर त्याने स्वराज्यामध्ये येताना जिंकलेली ठाणी पुन्हा हस्तगत करणे, यासाठी आधीपासूनच सैन्याची विभागणी करणे, त्यांना ते काम दिलेले असणे व त्यांनी ते करणे हे म्हणजे ‘डायरेक्टिंग’ आहे, दिशानिर्देशन आहे, अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा पळून जाण्यात यशस्वी झाला, कारण नेताजी पालकर ठरलेल्या वेळेला महाबळेश्वरला आला नाही. त्याबद्दल त्याची कानउघाडणी करणे हे महाराजांनी केलेली आहे. कंट्रोलिंग’ म्हणजे जे ठरलेले आहे हे सर्व होत आहे की नाही हे पाहणे. त्याच्या बाहेरचे काही होत असेल तर त्याला नियंत्रित करणे, वेळीच आवर घालणे. आजच्या काळामध्ये व्यवस्थापन शास्त्र शिकविणाऱ्या व शिकणाऱ्या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे मुळातून अभ्यासण्याची व अमलात आणण्याची आवश्यकता आहे.
अमोल पुसदकर
९५५२५३५८१३
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)