जर्मन तंत्रज्ञानाने जळगावात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; काय आहे ‘सिक्स्डफॉर्म’ तंत्रज्ञान?

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली असून त्यापैकी काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला २३ रोजी सुरुवात झाली. यावेळी अधिकाऱ्यांसह आमदार भोळे यांनी पाहणी करीत उत्तम प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नारळ वाढवून कार्याला सुरुवात झाली.

राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या विशेष मंजुरीने तसेच ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण आणि मदत व पुनर्वसनमंत्री ना. अनिल पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे उर्फ राजूमामा यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे.

शहराचा दुरोगामी विकास लक्षात घेता शहरात व्हाईट टॉपिंग पद्धतीचे काँक्रीटचे उत्तम दर्जाचे रस्ते झाले पाहिजे, असा मानस ठेऊनच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसोबतच विविध प्रभागातील कॉलनी एरियामधील रस्त्यांची कामे सुद्धा नियोजनात्मक पद्धतीने करण्यात येत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पातील ८५ कोटींच्या निधीतून मुख्य रस्त्यांची कामे व त्यासोबतच नगरविकास विभागाकडून मिळालेल्या १०० कोटींच्या निधीतून विविध प्रभागातील कॉलनी एरियामधील रस्त्यांच्या कामांना देखील सुरुवात झालेली आहे.

नागरिकांच्या भावना ओळखून येत्या २-३ महिन्यात उर्वरित सर्व रस्त्यांची कामे टप्या-टप्याने पूर्ण करुन ना. देवेंद्रजी फडणवीस व ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याहस्ते लोकार्पण केले जाईल. तसेच ‘आभाळ खूप फाटलेले आहे. तरी एक एक टाका मारत पुढे जायचं माझं प्रामाणिक प्रयत्न आहे,’ असे मनोगत ही यावेळी आमदार भोळे यांनी व्यक्त केले.

राज्यात भाजपाचे सरकार येताच जळगाव कलेक्टोरेट रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आमदार भोळे यांनी तत्काळ कार्य हाती घेतले. या कार्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २६ ऑक्टोबर रोजी कार्यारंभ आदेश प्राप्त झाले असून रस्ता कामाला आजचा मुहूर्त मिळाला. सोबतच निमखेडीचा जुना हायवे रस्ता, सूरत रेल्वेगेट ते शिवाजीनगर रस्ता, मोहाडी रस्ता, अजिंठा चौक ते नेरी नाका रस्ता, वाघ नगर ते गिरणा पंपिंग रस्ता या सर्व रस्त्यांसाठी कार्यारंभ आदेश झाले असून येत्या काही दिवसांमध्येच कार्याला सुरुवात होणार आहे.

काय आहे ‘सिक्स्डफॉर्म’ तंत्रज्ञान?
जळगाव शहरात प्रथमच एवढ्या प्रमुख व मोठ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम होतेय. त्यामुळे त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ‘सिक्स्डफॉर्म’ यंत्रणेद्वारे कॉंक्रिटीकरण होत आहे. यात एका बाजूच्या दहा मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण दोन भागात होऊ शकते. स्टीलचे काम मॅन्युअली करून, कॉंक्रिट पसरविण्याचे व लेव्हलिंगचे काम या यंत्रणेद्वारे केले जाते. अन्य मशिनच्या तुलनेत याद्वारे काम सोपे व लवकर होते. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा आहे. याआधी अजिंठा चौक ते मानराज मोटर्सपर्यंत श्री.श्री.इन्फ्रास्ट्रक्चरने विकसित केलेल्या महामार्गाच्या कामासाठी अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यात आली आहे.