जळगाव : महापालिकेतर्फे शहर इ-बससेवा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरु होता, अखेर तो प्रश्न सुटला आहे. जुन्या बसस्थानकाच्या जागेवर बसेससाठी जागा देण्यास एस. टी. महामंडळाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. त्यामुळे आता जुन्या बसस्थानकापासून बसेसचे मार्ग आखण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
केंद्र शासनातर्फे जळगाव शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी केंद्रांच्या योजनेतूनच शहराला वातानुकूलीत मोठ्या, मध्यम आणि मिनी बसेस मिळणार आहेत. बससेवा सुरू करण्याबाबत महापालिकेच्या शेवटच्या महासभेत मंजूरी देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनातर्फे त्यांची अमंलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे शहर बसेससाठी जागा शोधण्यात येत होती. अगोदर ख्वॉजामियॉं दर्ग्याजवळील मोकळ्या जागेवर स्थानक करण्यात येणार होते. मात्र त्याला विरोध झाल्याने महापालिकेने मेहरूण तलावाजवळील टी. बी. सॅनेटोरियमच्या जागेवर स्थानक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ते शहराच्या बाहेर असल्याने जागेचा शोध सुरू होता.
या दरम्यान महापालिकेतर्फे जुन्या बसस्थानकाची जागा मागण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. आता एस. टी. महामंडळाने केवळ बससेवेसाठी जागा देण्याचे तत्वत: मान्य केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाच्या जागेचा प्रश्न सुटला आहे.
महापालिकेतर्फे आता शहर बससेवेच्या रूटचे नियोजन करण्यात येत आहे. जुन्या बसस्थानकापासून बसेस सुटणार असल्याने त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. यात मोठ्या बसेस या महामार्गाच्या रूटवर, मध्यम बसेस शहरातील मुख्य कॉलनींसठी आणि मिनी बसेस या कॉलनी अंतगर्ततही असतील. या संपूर्ण इलेक्ट्रीक बसेस असतील व त्याचे चार्जिंगही जुन्या बसस्थानकावर करण्यात येईल. तसेच, शहरात इतर ठिकाणीही चार्जिंग पॉईट ठेवण्यात येणार आहेत.
जुने बसस्थानक येथून सुटणाऱ्या बसेस विद्यापीठ, पाळधी, गोदावरी मेडीकल कॉलेज, वावडदा, उमाळा फाटा, कानळदा, इदगाव, असोदा, भादली, हरिविठ्ठल नगर, मोहाडी धानोरा, हुडको वसाहतमार्गे पिंप्राळा, संभाजीनगर, एकनाथनगर, निमखेडी, शिवधाम मंदिर, शिरसोली या ठिकाणांपर्यंत प्रवासी वाहतूक करतील. तर, रेल्वे स्टेशन चक्री मार्ग ते महापालिका सतरा मजली इमारत व रेल्वे स्टेशन ते गाडगेबाबा चौक या मार्गावरही बससेवा उपलब्ध असणार आहे.