जळगावकरांनो, सावधान शहरात आढळले डेंग्यूसदृश्य रुग्ण

जळगाव : शहरात सध्या डेंग्यूसदृश्य साथीचा प्रार्दुभाव वाढत आहे. विविध हॉस्पिटलमधून आलेल्या माहितीनुसार शहरात 354 डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळून आले आहेत. साथ मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना करणे सुरू केले आहे. डेंग्यूच्या डासांची निर्मिती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने  मनपातर्फे वापरावयाच्या पाण्यात ॲबेटींग टाकण्यात येत आहे. मात्र त्याचा वास येत असल्याने नागरिक ते टाकू देत नसल्याच्या तक्रारी येत आहे. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे. डेंग्यू साथीच्या  प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा प्रशासक तथा  आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. प्रशासक तथा आयुक्त  डॉ. विद्या गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेने नियोजन करून डेंग्यू रुग्ण कमी करण्याबाबतचे निर्देश यावेळी दिलेत.

असे करा डेंग्यूच्या डासांचे निर्मूलन 

घरांच्या परिसरात पाणी साचू देऊ नका. डबक्याच्या स्वरूपात जमा झालेले पाणी प्रवाहित करावे. अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजवावे. जिथे कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत असलेली, परंतु जिथे स्वच्छ पाणी साचून आहे, अशा ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात यावीत किंवा पाण्यावर ऑइलिंग करण्यात यावे. घरात असलेले वापरावाच्या पाणी साठ्यात ॲबेटींग करण्यात येत आहे. त्यासाठी कर्मचारी घरोघरी ॲबेटींगसाठी जात आहेत. मात्र नागरिक त्यांना विरोध करत आहेत. वापरावयाच्या स्वच्छ पाण्यातच हे ॲबेटींग करण्यात येते. त्याचा वास काही वेळेनंतर निघून जात असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

अशी आहे आकडेवारी

मलेरिया कर्मचाऱ्यांनी तपासलेली घरे : 1,18,473.

डेंगूच्या आळ्या आढळून आलेली घरे : 4856

स्वच्छ पाणी तपासणी केलेली कंटेनर्स : 2,72,323

दूषित अळ्यायुक्त असलेली कंटेनर्स: 5287

रिकामी केलेले कंटेनर : 36,036

अळ्यानाशक औषध टाकलेले कंटेनर्स : 1,10,502

फॉगिंग मशीन द्वारे धुरळणी  केलेले क्षेत्र : 347

डासांची उत्पत्ती एकूण स्थाने : 232