जळगावमध्ये गारठा वाढला ; तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरला

जळगाव । उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. यामुळे राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. जळगाव देखील थंडीने गारठले आहे. जळगावातील तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरला असून यामुळे थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र चांगलाच गारठला असून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यातील निफाड, धुळे, जळगाव भागांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे थंडी वाढली आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत थंडीची ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण सोमवारी पूर्णपणे निवळले. रविवारी १२.६ अंशांवर असलेले किमान तापमान सोमवारी ९.६ अंशांवर आले. अर्थात, एकाच दिवसांत तीन अंशांने तापमान घसरले. त्यामुळे पहाटे गारठा जाणवत होता. दरम्यान पहाटे थंडी वाढलेली असली तरी दुपारी स्वच्छ सुर्यप्रकाशामुळे कमाल तापमान ३१.१ अंशावर पोहोचले होते. यंदा डिसेंबर महिन्याच्या अखेर व जानेवारीच्या सुरवातीला किरकोळ पावसाची शक्यता आहे. धुक्याची तीव्रताही वाढेल. पुढील चार दिवसात तापमानात आणखी घट होऊन गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी सांगितले.