जळगाव । बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळतोय. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उकाडा वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊनही अनेक दिवस उलटले तरी देखील मान्सूनने राज्यात दमदार हजेरी लावली नाहीय. मान्सून लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत असून अशातच राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जळगावचा देखील समावेश आहे. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास २३ जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. सध्या जळगावात ऊन सावलीचा खेळ सुरूय. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा 41 अंशावर आहे. पहाटेच्या वेळी आकाश प्रामुख्याने स्वच्छ दिसत असून दुपार आणि संध्याकाळच्या दिशेने हळूहळू अंशतः ढगाळ होत असल्याचे चित्र सध्या जळगावात दिसत आहे. मान्सून पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मान्सून कधी दाखल होईल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत