चोपडा ः चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे उमर्टीहून गावठी पिस्टल आणणाऱ्या जळगावातील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने अवैधरीत्या शस्त्र खरेदी व विक्री करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई 17 रोजी सकाळी 9.40 वाजेच्या सुमारास सत्रासेन गावाजवळ करण्यात आली. मनीष सम्राट थांबेत (19, रा.पिंप्राळा, ता.जळगाव), नितीन प्रमोद बोरसे (19, रा.इंद्रनील सोसायटी, खोटेनगर, ता.जळगाव), भायदास लालचंद पावरा (20, गौऱ्यापाडा, ता.चोपडा, ह.मु.पुणा हॉटेल, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गावठी पिस्टलाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. उमर्टी, ता.वरला येथून सत्रासेनमार्गे चोपडाकडे दोन दुचाकीवर संशयित येत असताना हवालदार राकेश पाटील, कॉन्स्टेबल रावसाहेब एकनाथ पाटील तसेच होमगार्ड प्रदीप शिरसाठ यांनी तीन संशयित येताना दिसल्यानंतर त्यांना अडवल्यानंतर त्यांची विचारपूस केल्यानंतर संबंधित उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांची झडती घेतली. त्यात मनीषकडे एक गावठी कट्टा तसेच खिशात दोन जिवंत काडतूस आढळल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन मोबाईल व दोन दुचाकींसह एक गावठी कट्टा व दा.न जिवंत काडतूस असा एकूण एक लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास हवालदार गणेश मधुकर पाटील करीत आहेत.