जळगावातील स्टेट बँकेत दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले, एका पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग, तिघांना अटक

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिराजवळील स्टेट बँकेच्या शाखेत पडलेल्या दरोड्याची ४८ तासात उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. बँकेतील करार तत्वावरील शिपाई या दरोड्यातील मास्टरमाईर्ंड निघाला आहे. आरोपी शिपायासह त्याचा नात्याने असलेला मेहुणा व रायगड पोलीस दलातील उपनिरीक्षक व त्याच्या वडिलांनी मिळून हा दरोडा टाकला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी शनिवारी सायंकाळी जळगावात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

शंकर रमेश जासक, रमेश राजाराम जासक (67, दोन्ही रा.कर्जत) व बँकेचा शिपाई मनोज रमेश सूर्यवंशी (जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असून शंकर जासक हा रायगड पोलीस दलातील उपनिरीक्षक आहे. दरम्यान, पोलीस दलातील अधिकार्‍यानेच दरोडा घातल्यानंतर पोलीस दलासह नागरीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे तर आरोपीला बडतर्फ करण्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र देण्यात आले आहे.

अटकेतील शंकर जासक याच्यावर अगोदर निलंबनाची कारवाई झाली असून गेल्या वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे तर आरोपीचा शालक मनोज रमेश सूर्यवंशी (जळगाव) हा जळगाव स्टेट बँकेत शिपाई आहे. जासक अडचणीत असल्याने त्याला आर्थिक मदत करण्यासाठी दोघांनी बँक लूटीचा डाव आखला. बँकेतील कर्मचार्‍यांच्या तसेच मॅनेजरच्या येण्याची वेळ, लॉकर तसेच गोल्ड ठेवलेल्या लॉकरबाबत इत्यंभूत माहिती मनोजने मेहुण्याला पुरवली व काही दिवस बँकेचीदेखील रेकी करण्यात आल्यानंतर गुरुवारी ठरल्याप्रमाणे सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आला मात्र पोलिसांना पहिल्या दिवसापासून बँक कर्मचार्‍यांवर संशय असल्याने त्यांची कसून चौकशी केली व मनोजच्या जवाबात तफावत आढळल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपी शंकर जासक याचे वडील जळगावपासून जवळच असलेल्या मन्यारखेडा येथील रहिवासी असल्याने उभयंतांना जिल्ह्याची चांगली माहिती होती शिवाय दरोडा घडल्यानंतर पोलिसांकडून काय कृती होईल हेदेखील ठावूक असल्याने त्याद़ृष्टीने आरोपींनी पद्धतशीरपणे दरोडा फत्ते केला.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, परीविक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतीष कुलकर्णी,परीविक्षावधीन विभागीय पोलीस अधिकारी, आप्पासाहेब पवार, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

शिपायाने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी कर्जत गाठत पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक यांना ताब्यात घेतल्यानंतर संशयितांनी कर्जतमधील घरातून 16 लाख 40 हजारांची रोकड व सहा किलो सोन्याचे दागिणे जप्त केले असून उर्वरीत 70 हजारांची रोकड जप्त करणे अद्याप बाकी आहे. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर मॅनेजरची दुचाकी कुसुंबा बसस्थानकाजवळ सोडून अन्य वाहनाने कर्जत गाठले तर जाताना आरोपींनी बँकेचे डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचार्‍यांचे मोबाईल एमआयडीसी परीसरातील एक नाल्यात फेकल्यानंतर ते यंत्रणेने जप्त केले होते.

http://पहा व्हिडीओ https://youtu.be/A3jKpxenKBs