तरुण भारत लाईव्ह । ९ सप्टेंबर २०२३। अंदमान निकोबार बेटांवर सी प्लेन ची सेवा दिलेल्या मेरीटाईम एनर्जी हेली एयर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अर्थात मेहेर या कंपनीने आता महाराष्ट्रातही सेवा सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये नागपूर, शिर्डी व जळगावहुन सेवा सुरु करण्याचे कंपनीचे नियोजन असून जळगावातील वाघूर धरणावरून सी प्लेन ची सेवा सुरु करण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडे नुकतीच प्राथमिक चर्चा केली आहे.
केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाण योजने अंतर्गत हवाई क्षेत्राच्या विकासावर मोठा भर दिला आहे. जर विमान कंपन्या इच्छुक असतील तर त्यांना देशभरातील लहान मोठ्या विमानतळावरून विमान सेवा देण्याची परवानगी देत आहे. जळगावसह नागपूर व शिर्डी या ठिकाणाहून सी प्लेन सुरु करण्याबाबत मेरीटाईम एनर्जी हेली एयर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अर्थात मेहेर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी दिल्लीतील डीजीसीएच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली.
यात जळगावातील वाघूर धरणावरून सेवा सुरु करण्याची चर्चा झाली तसेच विमानसेवेसाठी जळगावच्या भौगोलिक परिस्थितीबाबत जळगाव विमानतळावरील टू जेट या विमान कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक अखिलेश सिंग यांच्याशी देखील चर्चा केली असून आठवडाभरात या सेवेबाबत कंपनीचे अधिकारी खासदार उन्मेष पाटील यांची देखील भेट घेणार आहे.