जळगावात आज अवकाळी पावसाची शक्यता ; उकाड्यापासून मिळणार दिलासा!

जळगाव । एकीकडे जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाने कहर केला असून उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. यातच राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट कायम असून हवामान विभागाने आज रविवारी राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या जळगावात काहीसे आकाश ढगाळ असून तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. आर्द्रता पातळी देखील गडगडाटी ढग तयार होण्यासाठी अनुकूल आहे. सायंकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचले आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील हजेरी लावत आहे. अकोला येथे हंगामातील उच्चांकी म्हणजेच ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २० एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.