जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यामधील तापमानात घसरण झाल्याने गुलाबी थंडी जाणवत आहे. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच आठवडाभर तरी हा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार होत असून, काही दिवसात या क्षेत्राचे वादळात निर्माण होऊ शकते. त्यामुळे ५ ते ६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्यामुळे इयर एन्डपर्यंत गुलाबी थंडीचा जोर राहील. तर नवीन वर्षाचे आगमन मात्र पावसाने होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढू शकतो. मंगळवारनंतर आकाश किंचित ढगाळलेले असेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.