जळगावात खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव : के. सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा संचालित एकलव्य क्रीडा संकुलात खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थित होणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती, बॉक्सिंग, धनुर्विद्या, हॉकी, खोखो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास यांचे मूल्यमापन होईल. त्याकरिता एकलव्य क्रीडा संकुलचे ४० प्रशिक्षक व ३० स्वयंसेवक कार्यरत असतील. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास ८ ते १० हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे.

शिबिरात विविध क्रीडा प्रकारांसाठी कौशल्ये तपासण्यात येणार आहेत. खेळाडूंच्या व तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल, असा विश्वास मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांनी व्यक्त केला आहे.