जळगावात जयंत पाटील यांची बंदद्वार चर्चा

 

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला देण्यात आली आहे. या मतदार संघातून भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याकारणाने माजी आमदार संतोष चौधरी यांनी नाराजी व्यक केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी जळगावात दाखल झाले. मात्र, ते आल्यावर रावेर लोकसभा मतदार संघांचे उमेदवार विमानतळावर गेले नाहीत . तसेच बैठकीला सर्वात शेवटी हजर झाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका हॉटेल पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे , जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत चर्चा बैठकीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परंतु ज्या उमेदवारासाठी बैठक घेत आहेत ते रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील बैठकीला सर्वात शेवटी उशिराने पोहोचले. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सुद्धा बैठकीला हजर असल्याची चर्चा आहे.

जळगाव विमानतळावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले असता त्यांच्या स्वागतासाठी इतर सर्व पदाधिकारी पोहचले. परंतु, रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी इच्छूक होते. परंतु या ठिकाणी भाजपमधून एका दिवसापूर्वी आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे श्रीराम पाटील भाजपमध्ये फेब्रुवारी महिन्यात गेले होते. श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतोष चौधरी आणि त्यांचे समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. आता जयंत पाटील संतोष चौधरी यांची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी होतील याबाबत चर्चा रंगत आहे.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी येते आहेत. यापार्श्वभूमीतीवर ही बैठक घेण्यात आली आहे.