जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का..! सह संपर्कप्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्वाखाली शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडेल. सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरेंची डोखेदुकी वाढली होती. त्यातच राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्यात आलं आहे.

जळगावमधील ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील आणि युवा सेनेचे जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे जळगावमध्ये ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना जुन्या कार्यकर्त्यांना डावल्या जात असल्याच्या कारणाने ठाकरे गटात नाराजीचा सूर वाढला असून त्यामुळे सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.