जळगाव । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून यामुळे उन्हाची दाहकता वाढली आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांसह मानवी जीवनावर होत आहे. वाढत्या उष्णतेपासून काळजी घेणे आवश्यक बनले आहे. यातच वाढत्या तापमानच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २५ मे ते ३ जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.शिवाय खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसापासून जळगावातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सकाळपासून तापमानाचा पारा ४० अंशावर जात आहे. दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येते. उष्णतेच्या झळा रात्रीपर्यंत कायम असतात. आगामी आणखी काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केले आहेत.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आज दि. २५ मे ते ३ जूनपर्यंत पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येत आहे. खालील प्रमाणे आदेशीत करण्यात येत आहे.
1) उक्त नमूद कालावधीत अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही.
2) ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करुन घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची राहील, याबाबत काहीएक तक्रार असल्यास ती संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलीस विभाग यांचेकडेस करता येईल.
3) खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चाललवावेत. तद्नंतर सकाळी १० ते ५ या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे, कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील.