जळगाव : बसची तपासणी करण्याच्या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवार, २९ रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या घटनेत एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाहेर गावाहून बस आल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी ती आगारात नेण्यात येते. त्यानुसार सोमवार दि. २९ रोजी देखील काही बस तपासणीसाठी आगारात नेण्यात आल्या होत्या. त्या वेळी आपल्या बसची अगोदर तपासणी होऊन ‘रिमार्क’ मिळावा, यावरून चालक योगेश धर्मराज माळी (वय ४३, रा. पाळधी) व शुभम सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. त्या वेळी तेथे योगेश माळी यांचे भाऊ हे देखील तेथे आले. ते सुद्धा बस चालक असून सूर्यवंशी यांनी दोघांच्या डोक्याला, हाताला दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी योगेश माळी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुभम सूर्यवंशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.