जळगाव : लग्नासाठी आलेल्या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी अंडरग्राउंड सेप्टी टँकमध्ये बुडून मृत्यू झाला. शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्कमध्ये शनिवारी (ता. ९) रोजी ही घटना घडली. तस्मिरा परवेझ सय्यद (७) असे मृत बालिकेचे नाव आहे.
दरम्यान, तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या अक्रोशने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते. लग्न मंडपात पंगत संपवून नवरीची विदाई होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने एकच आक्रोश आणि किंचाळ्यांनी मंडपासह लग्नघर हादरले.
शहरातील उस्मानिया पार्क परिसरात शनिवारी (ता. ९) राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी मुक्तार सय्यद यांच्या घरी मुलीचे लग्न असल्याने त्यांचे जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर ठिकाणचे नातेवाईक लग्नासाठी आले होते. निजामपूर (ता. साक्री) येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या.
उस्मानिया पार्क परिसरातील गट नं. (४१७/३-अ) मध्ये खासगी बिल्डर्सकडून ड्युप्लेक्स स्किम अंतर्गत मागूनपुढून आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.
लग्नाचा गल्लीतच मंडप टाकण्यात आला होता. मंडपाजवळच चार ड्युप्लेक्स बंगलोचे बांधकाम सुरू असून प्रत्येक घरात स्वतंत्र सेप्टिक टँक बांधले आले. बांधकामासाठी लागणारे पाणी याच या टाक्यांमधून घेतले जात असल्याने त्या पाण्याने भरलेल्या होत्या. सर्वच लहान मुले बांधकामाच्य ठिकाणी, वाळूवर खेळत असल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले.
स्लॅबचे काम सुरू असल्याने त्यांनी लहानग्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना भरलेला सेप्टीटँक दिसला. त्यांनी एकेक करून चारही घरातील टँक पाट्यांनी झाकण्यास सुरवात केली. चौथ्या टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने कुणाची बाहुली टाकीत पडली म्हणून डोकावले असता त्यात मृत बालिका आढळली.
पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. तरुणांनी उडी मारून बालिकेला बाहेर काढले. तत्काळ रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी बालिकेला मृत घोषित केले.
दरम्यान, सातवर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झालेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याच्या टाकीसाठी खुला भूखंड म्हणून ही जागा आरक्षित केल्याचे काही जणांनी सांगितले, तर जवळच एक डकी विहीर असून ती बुजून गाळरस्ताही गडप करण्याचा घाट कथित बिल्डरमार्फत सुरू असल्याचे सांगण्यात आले. संबंधित बिल्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
पोलिस दल अनभिज्ञ
वडनगरी फाटा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा सुरू असल्याने त्याच्या बंदोबस्तात अख्खे पोलीस सदल व्यस्त आहे. उस्मानिया पार्क भागात गंभीर घटना घडलेली असतानाही रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती. तर, पोलिसांत कुठलीही नोंद न करता नातेवाईक बालिकेचा मृतदेह घेऊन परस्पर साक्रीला निघून गेल्याचे सांगण्यात आले. बिल्डरच्या निष्काळजीमुळे बालिकेचा मृत्यू झाला असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली.