जळगावात मंदिरांसह फोडली चार घरे; कर्जाची रक्कमही लांबविली

Crime News : जळगाव जिल्हयात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा अमळनेर तालुक्यात मंदिरांसह चार घरे चोरट्यांनी फोडली. यात गरीब शेतमजुरांचे सोने- चांदीसह एक लाख रुपये चोरून नेले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

दोधवद येथील भरत झगा भोई हे बाहेर झोपलेले असताना चोरट्यांनी मागच्या बाजूने घरात प्रवेश करून ४० भार चांदी,२ ग्राम सोने व रोख दोन हजार रुपये चोरुन नेले.  जवळच असलेल्या हिंगोणे खुर्द गावात पांडुरंग हिंमत कोळी या मजुराच्या घरातही मागच्या बाजूने प्रवेश करून २० हजार रुपये तर उखा सखाराम कोळी यांच्या पत्नीने काढलेल्या बचत गटाचे कर्जाची रक्कम ११ हजार रुपये लांबविले.

तसेच म्हाळसादेवी व दमोता माता मंदिरातील दानपेटीतील सुमारे २० हजार रुपये चोरून नेले आणि दानपेटी गावाबाहेर फेकून दिली. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लोक बाहेर झोपलेले असतात आणि गरीब मजूर घराला कुलूप देखील लावत नाहीत, त्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. घटनेची माहिती मारवड पोलिसांना  कळवण्यात आली आहे.