जळगाव : शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यास काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी निदान पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या शाळेजवळ असलेले ‘अवैध धंदे’ तरी बंद करा हो…’ असे साकडे महापालिकेच्या शाळा क्रमांक २ व १९ च्या मुख्याध्यापकांसह शाळेतील पालकांनी लेखी निवेदनाव्दारे जिल्हा पोलीस अधिक्षकांना घातले आहे. असेच साकडे त्यांनी महापालिका आयुक्तांनाही घातले आहे. यावर तूर्तास तरी या दोन्ही प्रमुखांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
पिंप्राळा हुडको येथे असलेल्या महापालिकेच्या घरकुलांतील नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तत्कालीन नगरपालिकेने शाळा क्रमांक २ व शाळा क्रमांक १९ उर्दू माध्यम अशा दोन शाळा सुरू केल्या आहेत. या दोन्ही शाळांची पटसंख्याही बऱ्यापैकी असून मुख्याध्यापकांसह शिक्षक वगनि शाळेचा शैक्षिणक दर्जा उत्तमपणे राखला आहे.
अवैध धंदे जोरात
कष्टकऱ्याची वस्ती म्हणून पिंप्राळा हुडकोची ओळख आहे. महापालिकेच्या शाळेजवळच अवैध धंदे सुरू झाले आहेत. शाळेच्या भिंतीजवळच दारूचा अड्डा आहे. दारूडे रात्री शाळेच्या आवारात बैठक मांडून दारूचे सेवन करतात. तर तेथेच सट्टा, जुगार खेळतात. शाळेच्या वर्ग खोल्या व परिसरात घाण करत असतात.
विरोध कोण करणार
या लोकांना विरोध केला असता ते भांडण करत वाद घालत असंसदीय भाषेत बोलत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षक जास्त वाद किंवा प्रकरण वाढू नये म्हणून माघार घेत असतात. याबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनास पत्र व्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या लोकांची मुजोरी वाढली आहे.
विद्यार्थ्यांच्या मनावर होतोय परिणाम
शाळा परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. शाळेच्या आवारात व वर्गात पडलेल्या दारूच्या बाटल्या शिक्षकांसह शिपायांना उचलून फेकाव्या लागतात.
परिसर बनतो शौचालय
शाळेला सद्य:स्थितीत असलेली संरक्षक भिंत तुटलेली आहे. गेटही खराब झालेले असल्याने शाळेत कोणीही केव्हाही येत असते. शाळेजवळ असलेले नागरिक रात्री व पहाटे शौचासाठी परिसरात येत असतात. त्याच्या दुर्गंधीचाही त्रास होत असतो. अशा त्रासातही शिक्षक अध्यापनाचे काम करत असतात.
किरकोळ कामासाठी पदरमोड
शाळेच्या महत्त्वाच्या पण किरकोळ कामासाठीही शिक्षकांना पदरमोड करावी लागते.
तत्कालीन शहर अभियंत्यानी केले दुर्लक्ष
शाळेच्या समस्यांबाबत या दोन्ही शाळांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्तांसह तत्कालीन शहर अभियंत्यांना पत्र दिलेले आहेत. परंतु या सर्वांनी त्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केत्याने या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे.
एकाच इमारतीत दोन शाळा
एकाच इमारतीत शाळा क्रमांक २ व शाळा क्रमांक १९ अशा चालविल्या जात आहेत. मुख्याध्यापकांची खोली, शिक्षकांची खोली, लिपीकांसाठीची खोली सोडून उर्वरीत खोल्यामध्ये वर्ग भरत असतात. त्यामुळे विद्यार्थी संख्या पाहता वर्ग खोल्या अपूर्ण पडत आहेत.
लवकरच बंदोबस्त
दरम्यान शाळेजवळील अवैध धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिले. त्यावेळी शाळेजवळील अवैध धंद्यांचा लवकरच बिमोड करण्याचे आश्वासन शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहे.
नगरसेवक इमारत देण्यास तयार
वर्गखोल्या कमी असल्याने एका वर्गखोलीत दोन वर्ग भरवावे लागतात. त्यामुळे नविन वर्ग खोल्या बांधण्याबाबत तत्कालीन महापालिका प्रशासनाने दूर्लक्षच केले आहे. यावर पर्याय म्हणून स्थानिक नगरसेवकांनी शाळेसमोर असलेली त्यांच्या मालकीची दुमजली इमारत शाळेसाठी देण्याचे मान्य केले आहे. मात्र त्यासाठी महापालिका शिक्षण मंडळ आणि प्रशासनाने करार करणे गरजेचे आहे. तो झाला तर एका वर्गात दोन वर्ग बसवण्याची गरज पडणार नाही.
दुरूस्तीसाठी निविदा
शाळांच्या दुरूस्तीसाठी निविदा काढणार आहे. मुख्याध्यापकांनी मागणी केल्यानुसार आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याकडे लक्ष देणार आहे. – चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, मनपा, जळगाव
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात संवाद
महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना गेल्या १० वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेले नव्हते. ते मात्र यावर्षी देण्यात आले. या सोहळ्यात मुख्याध्यापक व शिक्षकांशी समोरासमोर संवाद साधता आला. शाळेबाबतच्या समस्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष देणार आहे. – ज्ञानेश्वर ढेरे, आयुक्त, मनपा जळगाव
काय आहे नियम
शाळा परिसरात १०० मिटर परिसरात दारूच्या दुकानास परवानगी देऊ नये. तसे जर झाले असेल तर ते दुकान दुसरीकडे स्थलांतरीत करावे किंवा त्याची मान्यता रद्द करावी, यासोबतच शाळेच्या १०० मिटर परिसरात पानटपरी नसावी. मात्र या शाळेजवळ या दोन्ही नियमांची पायमल्ली होत आहे.