जळगावात मायलेकाला बेदम मारहाण; काय आहे कारण?

जळगाव : घरासमोरील रस्त्यावरील कामाच्या ठिकाणाहून खड्डा बुजविण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे मटेरियल घेतल्याच्या कारणावरून मायलेकाला बेदम मारहाण केली.  तांबापूराजवळील गवळीवाडा येथे शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही  घटना  घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबापूराजवळील गवळीवाडा येथे  दिनेश राजू भोई (३७) हा तरूण आपल्या आई तुळसाबाई भोई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. व्यापार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून दिनेश भोई यांच्या घरासमोर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिनेश भोई यांनी काम करण्याच्या ठिकाणाहून तेथून सिमेंट काँक्रीट मटेरियल घेतले.

त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या एका जणाने शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्याचे दोन्ही मुलेही तेथे आले व त्यांनीही शिवीगाळ करीत भोई यांना मारहाण केली. यात लाकडी दांडक्याने मारहाण करण्यासह गवंडी कामाची थापी डोक्यावर मारुन जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी दिनेश भोई यांच्या आई तुळसाबाई या तेथे आल्या. त्यांना देखील तिघांनी मारहाण केली. या प्रकरणी दिनेश भोई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या नाना हटकर, आदेश नाना हटकर आणि राहूल नाना हटकर या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.