जळगाव : शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. अशातच चाळीसगाव शहरात दुचाकीसह रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडली होती. अखेर या प्रकरणातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत तिघांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्पलेक्स परिसरात फिर्यादी तन्वीर शेख यांची ४९,०००/- रु. कि.ची मोटार सायकल उभी केलेली होती. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी अज्ञात दोन इसम चोरी करून घेऊन जात असताना फिर्यादी यांना दिसून आले. त्यांनी लगेच आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील एक इसम गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकों अजय पाटील, अमोल भोसले, शरद पाटील हे घटनास्थळी हजर होऊन ताब्यातील इसमास पोलीस स्टेशनला हजर केले. व तन्वीर शेख यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात ताब्यातील आरोपी एकनाथ चव्हाण रा. लोंजे ता.चाळीसगाव याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात त्याचा मित्र गणेश जयराम चव्हाण याने प्रोत्साहन तसेच मदत केल्याची माहिती दिली. तरी सदर गुन्ह्यात गणेश चव्हाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी त्यास तात्काळ शोध घेणेकामी सुचना देऊन आदेशीत केले. त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ अमोल भोसले, शरद पाटील, गणेश कुवर, निलेश पाटील, मोहन सुर्यवंशी, नंदु महाजन, प्रविण जाधव . विनोद खैरणार यांनी गणेश चव्हाण यांच्या त्याचे राहते गावी शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. तसेच सदर आरोपी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कस्टडी मिळाली आहेत.
त्याचबरोबर सन २०२१ मध्ये शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ फिर्यादी नामे मोहम्मद आसिफ इसा शहा यांची २,८००००/- रुपये किंमतीची रिक्षा चोरीस गेली होती. त्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पो.स्टे. कडुन कसोशीने करण्यात येत होता. सदर गुन्हा हा आरोपी नामे शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (वय-५२) रा. अब्दुल खालीक नगर, ईस्लामपुरा, मालेगाव जि. नाशिक याने केल्याची माहिती पो.ना. दिपक पाटील यांना प्राप्त झाली. सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याकडे सखोल चौकशी केली. त्यावर त्याने रिक्षा चोरीबाबत कबुली देऊन सदरची रिक्षा काढून दिलेली आहे. सदर आरोपीतास दि. २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली असुन मा.न्यायालयाचे आदेशाने सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे.
दरम्यान सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. तो लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने मोटार सायकलस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहन यांच्याकडेस मदत मागतो . आणि त्यांनी लिफ्ट दिली असता त्यांना विश्वासात घेऊन गुंगीकारक औषध मिश्रीत करून कचोरी, पेढे असे खाऊ घालतो. ते बेशुध्द होताच त्यांच्या ताब्यातील रिक्षा किंवा मोटार सायकल चोरी करुन पळ काढत असे. सदर आरोपीविरुध्द खुलताबाद, मालेगाव व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्यासह पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोना दिपक पाटील व पोकॉ अमोल भोसले करीत आहेत.