जळगावात २० महिन्यांत २ हजार ८२९ मुली व महिला बेपत्ता, ‘इतक्या’ महिलांचा अद्यापही लागला नाही शोध

जळगाव : जिल्ह्यात महिला व मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढताना दिसत आहेत. गेल्या २० महिन्यांत जळगाव जिल्ह्यातून २ हजार ८२९ मूली व महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेपत्ता झालेल्या महिला व मुलींपैकी १९८२ महिला व मूलीचा पत्ता लागला आहे, तर ८४७ महिलांचा अजूनही पता लागू शकला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

देशासह राज्यभरात देखील महिलांवर अत्याचारांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातच २०२३-२०२४ ऑगस्टपर्यंतच्या २० महिन्यात घरगुती हिंसेच्या ८०२ घटना घडल्या आहेत. अशा कारणांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते, त्यामुळे अनेक महिला टोकाचा निर्णय घेत आहेत. हीच परिस्थिती मुलीच्या बाबतीत घहत आहे.  यामध्ये ४०० हुन अधिक २५ वषपिक्षा कमी वयाच्या मुलींच्या समावेश आहे, तर २४०० हुन अधिक महिलांचा समावेश आहे.

तर २०२३ या वर्षभरात १ हजार ४०८ महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी २९४० महिला या पोलिसांच्या शोधानंतर सापडल्या. तर २६८ महिला आढळून आलेल्या नाहीत, तर या वर्षी ऑगस्ट २०२४ पर्यंत १ हजार महिला या आठ महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी ६१८ महिला सापडल्या, तर ३८४ महिलाचा शोध लागू शकलेला नाही. मुलींचीही हीच स्थिती आहे. सज्ञान मुलींची बेपता झाल्याबाबतची नोंद होते. तर अल्पवयीन मुलीच्या बेपता झाल्यानंतर अपहरणाची नोंद होत असते. ही नोंद धरल्यास या आकडेवारीत वाढ होऊ शकते.

‘आकडा वाढतोय वारंवार’
राज्य शासनाच्या वेबसाईटवरच बेपत्ता महिलांची संख्या देण्यात आली आहे, ज्याचा आकडा वारंवार वाढतोय. ग्रामपंचायतीपासून बालविवाह, कौमार्य चाचणी कोणताही मुद्दा असेल त्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही जिल्ह्यात जाऊन पीडित महिलांचे प्रश्न ऐकतोय. बालविवाहाची संख्या, अबॉर्शन, हुंडाबळी याच्या संख्या वाढत आहेत. अंधश्रद्धेचे बळी जातात, जादूटोणा केलं जातंय, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला.

प्रेमप्रकरण, नोकरीच्या आमिषात हे होतंय. शाळा, कॉलेजात मुलींचं काऊन्सिलींग होणं गरजेचं आहे. पालकही विनवणी करत आहेत की, या मुलींचं काऊन्सिलिंग व्हावं. पालकांची जबाबदारी आहे, त्यांनी मुला-मुलीशी संवाद साधत राहावा. आदिवासी भागातूनही आम्हाला तक्रारी येतात. त्याची माहिती आम्ही राज्य सरकारला देतो. त्यावर कारवाई करण्यात यावी, तातडीनं लक्ष देण्यात यावं. बेपत्ता होणाऱ्यांची संख्या कमी करणं हे ध्येय असायला हवं, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली.