जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार, 9 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापाळा रचून ग्रामपंचायत विभागातील दोन लिपीकांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. महेश रमेशराव वानखेडे (30, मूळ रा. नेर, जि. यवतमाळ) व समाधान लोटन पवार (35, रा. लालबाग कॉलनी, पारोळा) अशी लाचखोर लिपिकांची नावे आहेत.
ग्रामपंचायतीच्या 2021 मधील निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारास तीन अपत्यांबाबत चांगला अहवाल तयार करण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.
रायपुर येथील पन्नास वर्षीय तक्रारदार हे ग्रामपंचायतीच्या 2021 मधील निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात रायपूर गावातील गैरअर्जदारांनी तीन अपत्यांबाबत तक्रारअर्ज केला होता. संबंधित प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील लिपिक महेश वानखेडे यांच्याकडे प्रलंबित होते. त्यानंतर तक्रारदारांनी वानखेडे यांची कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी वानखेडे यांनी, त्ुामचा तीन अपत्यांबाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही, अशी मदत करतो. याकरीता 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले.
अन् जिल्हाधिकारी कार्यालयातच रचला सापाळा
याबाबत तक्रारदारांनी शनिवारी, 9 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी तक्रारीच्या पडताळणीच्या सूचना पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकास केल्या. याअनुषंगाने पथकाने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सापळा रचला.
यावेळी वानखेडे यांनी लाचेपोटीची 20 हजारांची रक्कम लिपिक समाधान पवार यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून लिपिक पवार यांना 20 हजारांची लाच स्वीकारताना दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लिपिक वानखेडे व पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव तपास करीत आहेत.
कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्ाात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी केले आहे.