जळगाव : वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवारपासून जिल्ह्यातील ४९७ आरोग्य केंद्रांवर विविध चाचण्यांसह आरोग्य तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजारांचे निदान झाल्यानंतर या शिबिरांच्या माध्यमातूनच मोफत औषधे पुरवली जाणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधनांसाठी तीन हजारांचे अनुदानही दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांच्या उपस्थितीत वयोश्रीसह विविध योजनांची माहिती देण्यात आली.
त्यानुसार समाजकल्याण विभागाने ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेंतर्गत दि. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ४७९ केंद्रांवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.
या शिबिरांत रक्तासह विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. आजारांचे निदान झाल्यानंतर मोफत औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. शिबिरांच्या माध्यमातून पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना उपकरणे खरेदीसाठी प्रत्येकी तीन हजारांचे अनुदान देणार आहेत.
यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, उत्पन्न व दुबार लाभाबाबतची कागदपत्रे व संबंधित कागदपत्रे घेऊन शासकीय रुग्णालयांमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय म हाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी केले आहे.