जळगाव जिल्ह्यातील हल्लेखोर वाळू माफियांना ‘मोका’ लागणार ?

जळगाव : शासकीय मालमत्ता असलेली वाळू नदीपत्रातून चोरी करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांंवर जीव घेणे हल्ले करणार्‍या वाळू माफियांचा शोध घेत त्यांच्यावर मोका सारखे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिाकर्‍यांकडे केली असल्याची माहिती छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आज ९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी रात्रीसाडे अकराच्या दरम्यान घडली. सुदैवाने यामध्ये त्यांचे प्राण वाचले. हा हल्ला अप्रत्यक्ष जिल्हा प्रशासनावरील हल्ला आहे. शासकीय मालकीची वाळू चोरून वरून अधिकार्‍यांवर जीव घेणे हल्ले ही अत्यंत गंभीर व सामान्य जनतेवर दहशत निर्माण करणारे आहेत.

गेल्या महिन्यात असाच जीवघेणा हल्ला एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड यांच्यावरही झालेला आहे. ही ताजी घटना असतानाही निर्ढावलेले वाळू तस्कर कुणालाही घाबरत नाहीत. ही चिंता निर्माण करणारी बाब आहे.जिल्ह्याच्या ज्या ठिकाणाहून वाळू उपसा करून बिनधास्त वाळू चोरून नेली जाते. गिरणा नदीवरील चाळीसगावपासून तर जळगाव पर्यंत जळगाव, एरंडोल तालुक्यात टाकरखेडा, वैजनाथ, बांभोरी, निमखेडी शिवार, आव्हाने, खेडी, उत्राण या परिसरातून दररोज किमान ३००० डंपर व ट्रॅक्टर जेसीबीद्वारे रात्रंदिवस हा उपसा बिनधास्त केला जात आहे.

याला विरोध करणार्‍या अधिकार्‍यांवर जीव घेणे हल्ले होतात, यासाठी स्थानिक माहितगार असलेले प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी, सर्कल व कोतवाल यांना विश्वासात घेऊन खर्‍या वाळू तस्करांची नावे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, याबाबत प्रशासनाने स्वतंत्र व सक्षम यंत्रणेच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलीसऐवजी राज्य राखीव पोलीस दलाच्या छावण्या प्रत्येक वाळू उपसा जिथून केला जातो त्या ठिकाणी ठेवण्यात याव्यात. बेकायदा वाळू उपसा होणार्‍या प्रत्येक ठिकाणची तपासणी करून प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी केली.