जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून गेल्या आठ दिवसांत तब्बल ५० मृतदेह आढळले आहेत. त्यात ५० पैकी १६ मृतदेह हे जळगाव शहरात बेवारस स्थितीत आढळल्याने खडबड उडाली आहे. या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, विविध कारणांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्हयात सूर्य आग ओकत आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे ते ३ जूनदरम्यान जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यातच शहरात आढळून आलेल्या 16 जणांमध्ये काही लोकांचा उन्हाच्या तीव्रतेमुळे, उन्हाच्या फटक्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मृतदेहावर मंत्री महाजन यांच्या जीएम फाऊंडेशनतर्फे अंत्यासंस्कार
बेवारस स्थितीत आढळलेल्या मृतदेहावर मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाऊंडेशनतर्फे अंत्यासंस्कार केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.
उष्मघातामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू !
उष्मघातामुळे जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात यावल तालुक्यात दोन, जळगाव शहरात दोन, पाचोरा एक असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडियावर समोर आली असून, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.