जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी (ता.२३) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचून कापसासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी जामनेर रस्त्यावरील पुलावर आल्याने जामनेर ते तोंडापूर वाहतूक बंद झाली.

पारोळा तालुक्यातील म्हसवे, जोगलखेडे, वडगाव प्र. अ. यासह पारोळा, चोरवड, शेळावे, बहादरपूर, तामसवाडी, सार्वे, बोळे या सात मंडळात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे कापसाला आलेली बोंडे गळून पडली आहेत तर मे महिन्याच्या झालेली कपाशीची लागवड धोक्यात आली आहे.

दरम्यान,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पीकविमा कंपनीने याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतीचे पंचनामे करावेत. तसेच कृषी विभागाने याबाबत लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.