जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढणार ?

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने टंचाईचीही तीव्रता वाढणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसास दीड ते दोन महिने उशिराने सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे पावसाळा लांबल्यास टंचाईची स्थिती जिल्ह्यात निर्माण होणार आहे. त्यांचा परिणाम जिल्ह्यातील प्रमुख धरण साठ्यावर होणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील प्रमुख ३ धरणांमध्ये अवघा ४५ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याचे नियोजन जिल्हा यंत्रणेकडून करण्याची गरज आहे.  अन्यथा धरणांचा जलसाठा जून महिन्यात संपुष्टात आल्यास पाणीटंचाईची भीषण स्थिती जिल्ह्यात निर्माण होऊ शकते.

जिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांमध्ये जिवंत साठा ४४.९२ टक्के असून मागील वर्षी हाच साठा ५०.८८ टक्के शिल्लक होता. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूर धरणात मागील वर्षी ७७.२६ टक्के साठा होता तो यावर्षी ६९.२१ टक्क्यावर आला आहे. गिरणा धरणात मागील वर्षी ३९.९९ टक्के साठा होता. त्यात घट होऊन २८.४८ टक्के साठा शिल्लक आहे. हतनूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हतनूर धरणात मागील वर्षी ४७.५३ टक्के जलसाठा होता तो यावर्षी वाढून ५४.९० टक्के झाला आहे.

मध्यम प्रकल्पात १३ धरणांचा समावेश होतो. यात बोरी, मन्याड, भोकरबारी, सुकी, अभोरा, अग्नीवती, तोंडपूरा, हिवरा, मंगळूर, बाहुळा, मोर, अंजनी, गुळ यांचा समावेश आहे. मागील वर्षी मध्यम प्रकल्पामध्ये ३५.९५ टक्के साठा होता. तो आजच्या स्थितीत ३६.३१ टक्के साठा शिल्लक आहे. दरम्यान, बोरी धरणात मागील वर्षी १५.३५ टक्के पाणीसाठा होता. परंतु यावर्षी कोरडे पडले आहे.

लघू मध्यम प्रकल्पातील निम्मे धरणात पाण्याचा ठणठणाट
लघू मध्यम प्रकल्पात २६ धरणांचा समावेश होता. त्यातील १३ धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिष्य निर्माण होणार आहे. यात हातगाव १, खडकेसीम, पिंप्री, वाघळा १, ब्राह्मणशेवगा, पिंपरखेड, कुंझर, वाघळा २, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळीभोसर, पथराड, कृष्णापुरी, निसर्डी, आर्डी, म्हसवा, कंकराज, शिरसमणी, पिंपळकोठा भोला, सावरखेडा, बोळा, मन्यारखेडा, विटनेर, पद्मालय, खडकेसीम यांचा समावेश आहे. मागील वर्षी लघु मध्यम प्रकल्पांमध्ये ६.०१ टक्के साठा होता. तो आजमितीस केवळ १ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठे धरण, मध्यम धरण व लघू मध्यम धरणांचा जल साठा मागील एकूण ४७.०८ होता. तो सद्य:स्थितीत ४२.२१ शिल्लक राहिला आहे.