जळगाव । राज्यात मागील जवळपास १५ दिवसापासून पाऊस सुट्टीवर गेला होता. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र आता पाऊस परतला आहे. मागील दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील काही भागात आज रविवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात रविवारसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाच्या सरी बरसत आहे. शनिवारी देखील जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरुच होती. त्यांनततर आज सकाळपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. दरम्यान, खान्देशात आगामी दोन तीन दिवस पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, ढगाळ वातावरण कायम राहू शकते. तसेच काही भागात किरकोळ पाऊस होऊ शकतो. २२ ऑगस्ट पर्यंत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो