जळगाव जिल्ह्यात विचित्र अपघात; तीन महिलांचा मृत्यू, २१ जण गंभीर

जळगाव : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. ही घटना पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्याजवळ आज  शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई गणेश कोळी (५५), योगिता रवींद्र पाटील (४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा), चंदनबाई गिरासे ( ६५) असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहेत. तर  या अपघातात २१ जण गंभीर जखमी झाले असून, उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे ता.शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारसाठी प्रवाशी वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच-१८ एम ५५५४) हे २२ जणांना घेऊन जात होते. सकाळी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर क्रमांक (जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) चा ताबा सुटल्याने भरधाव वाहने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण आपघातात तीन महिलाचा जागीच मृत्यू झाला. तर एकूण २१ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच बोळे परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी एकच गर्दी केली होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. दरम्यान, यावेळी रोडवरील दोन्ही बाजूची वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील जखमी
रणजीत सुरसिंग गिरासे (वय ६०), भरत रामभाऊ गिरासे (वय ६५), राजेशभाई कोळी (वय ४५), भीमकोर सत्तरसिंग गिरासे (वय ५०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (वय ४०), भुराबाई तात्या गिरासे (वय ४०), रेखाबाई अधिकार गिरासे (वय ५०), नानाभाऊ सुभाष गिरासे (वय ५५), भटाबाई साहेबराव गिरासे (वय ४५), सुनिता गिरासे (वय ४४), भुराबाई भीमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय ५०), सय्यद लियाकत (वय २१ रा. मालेगाव), हिराबाई विजयसिंह गिरासे (वय ४०), भीमकोरबाई जगत गिरासे (वय ६०), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय ६५), रंजनसिंग भारतसिंग गिरासे (वय ५५), रुपसिंग नवलसिंग गिरासे (वय ६०), दयाबाई रूपसिंग गिरासे (वय ५५), राजेबाई साहेबराव कोळी (वय ४५) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहे.