जळगाव : येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका रंगणार असून, या पार्श्वभूमीने कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, जिल्हयात शिवसेना (शिंदे गट) अन् राष्ट्रवादीला गळती सुरूच आहे. पाचोरा लुक्यातील आंबेवडगाव गावातील शिवसेना, राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे.
शिवसेनेच्या (शिंदे गट) ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा दीपक गायकवाड यांच्यासह सुनील देवरे, नितीन कोळपे, वैभव वाघ, दगडू चौरे, समाधान पाटील, सुनील कोळी, नसीर तडवी यांच्यासह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे.
आंबेवडगाव हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता परंतु आता गावातील प्रमुख लोकांनीच साथ सोडल्याने आगामी काळात शिवसेनेसाठी (शिंदे गट) ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
पाचोरा शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील शिंदे गटातील सर्वच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यानंतर आंबेवडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी सोड चिठ्ठी दिल्याने सत्तेत असणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना हा नक्कीच जोरदार धक्का असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे.