जळगाव । राज्यासह जळगावकरांना गेल्या महिन्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच बसला. तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. राज्यात ऑक्टोंबर हिट संपल्यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. शेतात शेतकरी खरीप हंगामाची काढणी करण्यास लागला असून यातच राज्यातील काही भागासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
तसेच दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आधीच यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रब्बीतील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आहे. आता अवकाळीचे संकट आल्यामुळे शेतकरी कोंडीत अडकला आहे. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाही, त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.