जळगाव पोलिसांची कामगिरी, अट्टल दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

 जळगाव : दुचाकी लांबविणाऱ्यांना जरब बसेल,अशी जबरदस्त कारवाई एमआयडीसी पोलिसांनी करत दानीश शेख कलीम(20) पिरजादेवाडा मेहरुण, सोमनाथ  जगदीश खत्री (21)  तसेच आवेश बाबुलाल पिंजारी (20)  दोन्ही रा. जोशीवाडा मेहरुण अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.  ठिकठिकाणाहून त्यांनी चोरुन आणलेल्या विविध अशा 9 मोटार सायकली  पोलिसांनी जप्त केल्या. या दुचाकी चोरीत एका अल्पवयीन मुलाचा संशयितांनी वापर केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली.

भुषण दिलीप पाटील (जुने जळगाव) यांची क्रमांक एमएच 19 डीवाय 8490 ही दुचाकी राम दालमिल येथून लांबविल्याची घटना  29 जुलै 2023 रोजी घडली.याप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोनि जयपाल हिरे यांनी अशा गुन्ह्यांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले.त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना सुचनाही केल्या. दरम्यान मेहरुण परिसरातील काही तरुण हे बाहेर गावावरुन महागड्या दुचाकी चोरुन आणल्या असुन त्या विकण्याच्या तयारीत आहे,अशी गोपनीय माहिती पोनि. हिरे यांना मिळाली. पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात पोउपनि दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, हेकॉ गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, किशोर पाटील,  सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे यांनी मेहरुण परिसरात गोपनीय पध्दतीने तपासचक्रे फिरविले.खात्री झाल्यानंतर तिघांना ताब्यात घेतले. या संशयितांचा साथीदार एका अल्पवयीन मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.  गुरांच्या बाजार परिसरातून 1 दुचाकी, पारोळा, औरंगाबाद,नाशिक, बीड येथून अनेक दुचाकींची चोरी केली अशी कबुली संशयितांनी चौकशीत पोलिसांना दिली. संशयितांकडून सुमारे 6 लाख 75 हजार किमतीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. न्यायालयात हजर केले असता तिघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

महागड्या दुचाकीवर मारला हात

रॉयल एनफिल्ड बुलेट, बजाज पल्सर,होंडा स्पलेंडर अशा महागड्या दुचाकीवर चोरट्यांनी हात मारल्याचे या तपासातून समोर आले.संशयितांनी दुचाकी गुन्हा घडवून आणण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा खुबीने वापर केला. दुचाकी कोठून लांबविता येईल,यासाठी या मुलाचा रोल चोरट्यांना मदतीचा ठरत होता,अशीही माहिती तपासातून समोर आली.