सौर ऊर्जेने झळकणार रेल्वेस्थानके; जळगाव, भुसावळसह 22 स्थानकांचा समावेश

भारतीय रेल्वे सेवेत सर्वच रेल्वेस्थानके ही सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, भुसावळ विभागातील २२ रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जा सिस्टिमचा उपयोग करून विजेचा वापर करणार आहे. यात १.२ मेगावॅट सोलर सिस्टम लावून झाली आहे. उर्वरित कामे सुरू आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाचे अंदाजे १ कोटी ४४ लाख रूपयांचे वीजबिलापोटी एक वर्षाची बचत होणार आहे.

भुसावळ परीक्षेत्रातील रेल्वेस्थानकांसह वर्कशॉप, पीओएच, एमओएच शेड येथेही या विजेचा उपयोग केला जाणार आहे. भारतीय रेल्वेत आधुनिकतेचा वापर केला जात आहे, याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सौर ऊर्जेचा उपयोग केला जात असल्यामुळे विजेची बचत होऊन सोलरच्या माध्यमातून कार्यालयांमध्ये वीज उपलब्ध केली जाणार आहे.

याच विजेवर रेल्वेस्थानकातील लाईट, विजेची उपकरणे, संगणक, तिकीट प्रणाली यांच्यासाठी याच विजेचा उपयोग केला जात आहे. यात डीआरएम कार्यालय, झोनल ट्रेनिंग सेंटर, मनमाड येथील रेल्वेचे वर्कशॉप येथे सोलरद्वारे वीज प्रवाह घेतला जात आहे. यात दोन प्रकारचे सोलर सिस्टम निर्मित आहे.

सौर उर्जेत विभाग अव्वल

मध्य रेल्वेत भुसावळ विभागाचा सोलर सौर उर्जा प्रकल्प लावण्यात प्रथम क्रमांक आहे. तर भारतीय रेल्वेत भुसावळ विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार विभागात ग्रीन उर्जा निर्माण केली जात आहे. पुढील वर्षात १.४ मेगावॅटचे ग्रीन उर्जा सोलर सिस्टिम लावण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

..या स्थानकांवर सोलर

भुसावळ विभागात सौर उर्जा सिस्टिमच्या वापरात जळगाव, भुसावळ, धुळे, हिरापूर, पाचोरा, सावदा, रावेर, निंभोरा, शेगाव, अमरावती, बऱ्हाणपूर, मांडवा, अकोला, बडनेरा, मूर्तिजापूर, गायगाव, खंडवा, डोंगरगाव, बगमार, चांदणी, नेपानगर, देवळाली या स्थानकांचा समावेश आहे.