जळगाव: सहा लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहराला महापालिकेच्या अग्निशमन विभागातील केवळ ४० कर्मचारी शिफ्टनुसार २४ तास सेवा देत आहे. विभाग सक्षम करण्यासह वाहनांची संख्या वाढवण्याकडे राजकीय पदाधिकारी तसेच प्रशासनानेही दुर्लक्षच केले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
महापालिका हद्दीत व हद्दीबाहेर कोणत्याही ठिकाणी आग लागल्यास ती विझवण्यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग चोवीस तास सज्ज असतो. सध्या ४० कर्मचारी शिफ्टनुसार सेवा देत आहेत. परंतु लोकसंख्येचा विचार करता ही संख्या अपूर्ण पडत आहे.
शासन नियमानुसार जळगाव महापालिकेत अग्निशमन विभागात २३८ कर्मचारी असायला हवेत. परंतु, सद्यस्थितीत चाळीसचं कर्मचारी कार्यरत आहेत. हा विभाग मनुष्यबळाच्या संख्येनुसार अधिक सक्षम करण्यासाठी अजून २०० कर्मचारी भरती करणे गजेचे आहे. अपूर्ण मनुष्यबळ असतानाही उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातूनचं हे कर्मचारी अतिरिक्तीचा ताण घेत सेवा देत आहेत.
असे आहे मनुष्यबळ
महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे शहरात शिवाजी नगर आयुक्तांचा बंगला, भाऊंचे उद्यान महाबळ आणि महापालिका इमारतीजवळील व.वा. मार्केट अशी तीन फायर स्टेशन आहेत. यातील व.वा. मार्केटजवळील फायर स्टेशन हे मुख्य फायर स्टेशन आहे. ही तीन्ही फायर स्टेशन मिळून ४० कर्मचारी कार्यरत आहेत. यात १ मुख्य अग्निशमन अधिकारी, १ सहाय्यक अग्निशमन अधिकारी, १० फायरमन, १८ वाहन चालक व १० क्लिनर असे एकूण ४० कर्मचारी आहेत. तर पिंप्राळा व औद्योगीक वसाहत येथे प्रत्येकी एक अशी दोन फायर स्टेशन प्रस्तावीत आहेत. याबाबत अजूनही प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव कागदावरच रेंगाळत आहेत
नगरसेकांची संख्या कमीच
महापालिकेत ७५ नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. तर ५ नगरसेवक है स्विकृत आहेत. अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा नगरसेवकांची संख्या जास्त आहे.
विभाग सक्षमीकरणाकडे दूर्लक्षच
वाढत्या शहरीकरणामुळे सध्य स्थितीत असलेल्या अग्निशमन यंत्रणेवर ताण येतो. कारण ही सेवा चोवीस तास असते. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचान्याला कर्तव्यकाळात सजग असावे लागते. आग केव्हा लागेल आणि फोन केव्हा येईल याचा भरोसा नसतो. त्यामुळे फोन येताच या कर्मचाऱ्यांना सज्ज होत तातडीने आगीच्या ठिकाणी जावे लागते. परिस्थिती पाहत आग विझवण्यासाठी पाईप घेवून आगीच्या ज्वाळांजवळ जात पाण्याचा मारा करावा लागतो. हे काम वाटते तेवढे सोपे नाही. आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी किंवा धुरामुळे गुदमरण्याचा धोकाही असतो असे असतांना हा विभाग मनुष्यबळाने आणि साहित्यांनी अधिक सक्षम करावा असे ना राजकीय पदाधिकाऱ्यांना वाटते ना महापालिका प्रशासनाला.
सहा वाहने तीही अपूर्ण
सध्या ६ बंब असून एक रेस्क्यु कम अॅब्ल्युलन्स आहे. ही वाहने अपूर्ण आहेत. या ताफ्यात अजून ७८ नवीन वाहनांची गरज आहे.
असा आहे शासन नियम
शासनाच्या नियमानुसार एका वाहनावर ६ कर्मचारी हवेत. मात्र जळगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबावर एका वेळी दोन ते ३ च कर्मचारी जात असतात. तीन कर्मचारी हे राखीव ठेवावे लागतात. एकाचवेळी दोन आगीच्या घटना घडल्या तर तेथेही तात्काळ सेवा देता येते.