जळगाव : रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू, रोहिणी खडसे यांचा निर्धार

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे व मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हटले कि, रावेर मतदारसंघातून आमच्या कुटुंबातील उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली असली, तरी पक्षाच्या विचारधारेला बांधील राहण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे.रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू,असा निर्धारही त्यानी व्यक्त केला.

रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अथवा नात्याने नणंद असलेल्या रोहिणी यांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा होती. तथापि, एकनाथ खडसे यांनी प्रकृतीच्या, तर रोहिणी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या कारणातून पक्षाला नकार दिला. त्यानंतर खडसे यांच्यावर स्वपक्षातून टीका करण्यात आली. पक्ष अडचणीत असताना खडसे यांनी कन्या रोहिणी यांना उमेदवारी द्यायला हरकत नव्हती, अशी टिप्पणी करताना स्थानिक स्वपक्षीयांनी, खडसे यांनी सुनेला सोयीची ठरेल, अशी भूमिका घेतल्याची जाहीर टीका केली होती. त्याला रोहिणी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही पिता-कन्या पक्षाच्या विचारधारेला बांधील आहोत. रावेर मतदारसंघात पक्ष देईल, त्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करून भाजप उमेदवाराला पराभूत करू, असा निश्चयी सूर त्यांनी व्यक्त केला.

रक्षा खडसे आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहोत. आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. रक्षा यांनी प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे. इतकेच नव्हे, तर माझी आई जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला उभी होती, तेव्हाही रक्षा यांनी आईविरोधात प्रचार केला होता. याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्याविरोधात ठामपणे उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारास मोठ्या फरकाने निवडून आणू, असेही रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले