जळगाव राज्यातील ‘कोल्ड सिटी’ ; नीचांकी तापमानाची नोंद

जळगाव । उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत असून त्याचा फटका रेल्वेसेवा आणि विमानसेवेला बसला आहे. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली असून राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जळगावसह राज्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.

राज्यात सर्वात ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असणाऱ्या जळगाव शहराचा पारा सर्वाधिक घसरला आहे. जळगाव राज्यातील ‘कोल्ड सिटी’ झाले आहे. सोमवारी राज्यात जळगावचा पारा सर्वात नीचांकी 9.9 अंशांपर्यंत नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर व पुणे शहराचा पाराही 10 ते 12 अंशांवर दरम्यान होता.

संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होताच तापमानात वाढ होण्याऐवजी सायंकाळनंतर तापमान घसरणे सुरु झाले आहे. राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार महिने थंडीचे मानले जातात. त्यातही फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेनंतर तापमानात वाढ होत जाते. त्यामुळे मुख्यत्वे करून नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने थंडीचे मानले जातात. गेल्या अडीच महिन्यांपासून हिवाळा सुरू झाला असला, तरी अद्यापपर्यंत कडाक्याची थंडी जाणवली नाही. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात गेल्यावर्षी दोन ते तीनवेळा थंडीची लाट आली होती. मात्र, यंदा अर्धा महिना संपल्यानंतर पहिल्यांदाच पारा १० अंशाच्या खाली आला असून, सोमवारी जळगाव शहरात ९.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे काहीअंशी गारठा वाढला होता.