जळगाव : वरणगावातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा, काय आहे कारण ?

वरणगाव : भाजपच्या रावेर लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात वरणगावसह परिसरातील दोनशे पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी नकोच अशी भूमिका घेत वरणगाव भागातील भाजपच्या २०० पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहे.

भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने त्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली आहे. अश्यातच वरणगाव येथील पदाधिकारी,कार्यकर्ते व बूथ प्रमुख मिळून २०० जणांनी रविवारी आपल्या पदाचे राजीनामे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हाध्यक्ष आमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत. याआधी यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

खासदार रक्षा खडसे या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करतात. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. रक्षा खडसे यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.