जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; फोडले ज्वेलर्स दुकान

जळगाव : शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच होत असून असे गुन्हे रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरते आहे. जबरी चोऱ्यांप्रमाणेच घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. अशातच पुन्हा नवीपेठ भागातील लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज शुक्रवार, १ रोजी सकाळी उघडकीस आली. गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात वीज गेली होती. याचाच फायदा घेत चोरटयांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलीस सूत्रानुसार, नवीपेठेत हेमंत रुंगठा, त्रिलोक रुंगठा यांचे १९५८ पासून असलेले जुने लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाने दुकान असून या दुकानात दागिने घडविण्याचे काम केले जाते. गुरुवारी नेहमी प्रमाणे हेमंत रुंगठा रात्री साडे दहा वाजेपर्यंत उपस्थित होता.

चोरटा सीसीटीव्हीत कैद
त्याने दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री १ वाजून ५३ मिनिटाला एक चोरटा हा दुकानात आला. त्याने दुकानाची पट्टी तोडून आत प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी या चोरट्याकडून न खुलल्याने त्याने चांदीचे काही तुकडे घेऊन सीसीटीव्हीच्या वायरी कापून पलायन केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह श्वान पथकाने पाहणी केले. तसेच यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेशिवाय इतर नामांकित खासगी बँका असल्याने आणि या गल्लीत नामांकित प्रतिष्ठाने असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.