जळगाव शहर नागरी सुविधांपासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटातर्फे विविध मागण्या

जळगाव : शहरातील, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे व इतर नागरी सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, १२ जून रोजी आयुक्तांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,  जळगाव शहरात  गेल्या तीन महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असून महापालिकेतर्फे राज्य शासनाने व केंद्र शासनाने कार्यान्वीत केलेली अमृत योजनेमार्फत मिळणारे पाणी अजूनही पुर्णवेळी व पुर्ण दाबाने मिळत नाही.  पाणी अवेळी व विस्कळीतपणे मिळते.  शहरातील बहुसंख्य भागातील नागरिकांना नवीन नळ संयोजन देण्यास मनपा अयशस्वी झाली आहे. जळगाव शहरातील स्वच्छतेबाबतही नागरीकांच्या तक्रारी वाढल्याअसून शहरातील स्वच्छतेचा मक्ता खाजगी ठेकेदारांना दिला आहे.  शहरातील रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये आदींचा ठेका दिला असल्याने मक्तेदार व आरोग्य विभागातील अधिकारी फक्त स्वच्छता न करता खोटी बिले काढण्यास स्वारस्य दाखवत आहेत.  शहरातील नागरीकांचे जळगाव शहर मनपा हद्दीत असलेल्या पथदिव्याबाबत ही नागरीकांच्या तक्रारी असून पथदिवे बसवणाऱ्या मक्तेदाराने गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दिवे बसविणे व दुरूस्ती काम थांबविल्याने शहरातील बहुसंख्येने दिवे बंद आहेत.

जळगाव शहरातील भागात सिमेंट रस्ते बनविणे सुरू असून शहरातील सिमेंट रस्ते बनविताना त्यात आवश्यक असणारे सिमेंट, रेती, खडी दुय्यम दर्जाचे वापरण्यात येत आहे. जळगाव शहरात होत असलेल्या रस्त्याबाबत थर्ड पार्टी तपासणी करून क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करावी. जळगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देतांना युवक अध्यक्ष रिकु चौधरी,सरचिटणीस सुनील माळी, उपाध्यक्ष किरण राजपूत, युवक सरचिटणीस हितेश जावळे, सरचिटणीस सुहास चौधरी, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष डॉ.रिझवान खारीक आदी उपस्थित होते.