जळगाव : शिरसोली प्र. बो. येथील संजय हरी पाटील (वय ३२) या तरुणाने चक्क गावातील स्मशानभूमीत शर्टाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शिर्डीला जात असल्याचे सांगून संजय पाटील हा घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर त्याने थेट स्मशानभूमी गाठली आणि जीवन संपविलं, अशी माहिती समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रानुसार, संजय हरी पाटील हा शिरसोली प्र.बो येथे कुटुंबासह वास्तव्यास होता. तो ट्रकचालक म्हणून काम करत होता. गुरुवारी संध्याकाळी संजय पाटील हा शिर्डीला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्यांनी गावातील स्मशानभूमी गाठली. या स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेवून संजय पाटीलने आत्महत्या केली.
गावातील गोलू पवार हे स्मशानभूमी परिसरातून जात असताना त्याच्या लक्षात ही बाब आली, त्यांनी तत्काळ घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील शरद पाटील, श्रीकृष्ण बारी यांना कळविली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकाराची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं. नागरिकांच्या मदतीने संजय पाटील याला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, संजय पाटील याने कौटुंबिक कारणासाठी काही जणांकडून हातऊसनवारीवर पैसे घेतले असल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. याच कर्जबाजारीपणामुळे ते नैराश्यामध्ये होते. त्यातूनच त्याने टोकांच पाऊल उचललं, अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. मात्र, नेमकं किती कर्ज होतं, हा कर्जाचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत.