जाणून घ्या! नाकाव्दारे लस ‘कधी’ उपलब्ध होणार?

जळगाव : कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर लसीचे दोन आणि वर्धक असे तीन डोस आरोग्य विभागातर्फे देण्यात येत आहेत. यात आता नाकाव्दारे देण्यात येणारी ‘इकोव्हॅक’ कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक लस विकसित झाली आहे. १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांसाठी ही लस फक्त खासगी रूग्णालयांमध्ये जानेवारीत उपलब्ध होणार असल्याची माहिती शाहू महाराज रूग्णालय प्रशासनाने दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती कंपनीतर्फे १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड, कोवॅक्सीन तसेच १२ ते १७ वयोगटासाठी कार्बोवेक्स लस उपलब्ध होती. परंतु या कंपनीतर्फे आता नाकावाटे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ लस विकसित करण्यात आली आहे.

१८ वर्षे किंवा त्यापुढील वयोगटातील नागरिकांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन चे एक किंवा दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना किमान ६ महिन्यानंतर इन्कोव्हॅक लसीचा बूस्टर डोसदेखील घेता येणार आहे. इन्कोव्हॅक ही जगातील पहिली इंट्रानेझल म्हणजे नाकातून देण्यात येणारी लस आहे. कोविड प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडून सर्व चाचण्यांमध्ये लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. त्यामुळे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून इन्कोव्हॅकच्या बूस्टर डोसच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्य आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व इतर अधिकार्‍यांना दिलेल्या परिपत्रकात देण्यात आले असल्याची माहीती शाहू महाराज रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी दिली.
१८ वर्षे वा त्यावरील नागरिकांनी अजून कोणतेही डोस घेतलेले नाहीत अशा नागरिकांना ‘इन्कोव्हॅक’ या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. तसेच बूस्टर डोसदेखील उपलब्ध होतील. कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसनंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस म्हणून इन्कोव्हॅकचा डोस घेता येणार आहे. सद्यःस्थितीत जानेवारी अखेर पर्यंत ही लस खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होईल असेही डॉ.रावलाणी यांनी सांगीतले.