जातपात पाहून मतदान करू नका, नितीन गडकरींचे मतदारांना आवाहन

मराठवाड्यातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बीड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा पुढील काही तासांतच थंडावणार आहेत. तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवत पंकजा मला लेकीसारखी असल्याचे म्हटले. गडकरींच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करून दाद दिली. ‘भारत, विकासकामे, काँग्रेसचा कार्यकाळ, मोदींचा कार्यकाळ यासह जातीय कारणावरही गडकरींनी बीडमध्ये भाष्य केले.

जातपात पाहून मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी केले.नितीन गडकरींनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली. पंकजा मला मुलीसारखी आहे. पंकजामध्ये कर्तृत्व आहे, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही, तर तिच्यात काम करण्याची धमक आहे. तिच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व, नेतृत्व आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करणारी, वेळ पडल्यास स्वपक्षातही संघर्ष करणारी पंकजा आहे.

पंकजा खासदार झाल्यास महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देऊ शकते. या जिल्ह्याचा, मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास कमळाचे बटण दाबून पंकजाला निवडून द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. १०१ टक्के निवडून येणार, लाखोंच्या मतांनी निवडून येणार, असे म्हणत नितीन गडकरींनी नागपूरमधील विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मी माझ्या लोकांना सांगितले आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे, जनता माझा परिवार आहे. हे सांगायची हिंमत आहे माझ्यात, जो करेगा जात की बात, पडेगी कस के लाथ… असे म्हणत नितीन गडकरी यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला.

जात-पात-धर्म- पंथ-भाषा याचा विचार केला नाही पाहिजे, तुम्हाला हृदयावर शस्त्रक्रिया करायची असल्यास माझ्या जातवाल्याकडे करू असा विचार करता का, काही खायचे असेल तेव्हा विचार करता का, असा प्रश्न विचारत विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाला, पंकजाला निवडून द्या, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. बीडच्या बायपाससह, रिंग रोड, स्लीप रोड, उड्डाणपुलाचेही काम निश्चितपणे करून देईल. पण, पंकजाला निवडून द्या तरच माझ्याकडे या, नाहीतर येऊ नका, असा मिश्कील टोलाही
गडकरींनी लगावला.