जालना-जळगाव रेल्वे प्रकल्पाचे काम होणार गतिमान -ना.अब्दुल सत्तार

सोयगाव : जालना – जळगाव या 174 किमी च्या नवीन रेल्वे प्रकल्पाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी राज्य शासनाने रेल्वे लाईन प्रकल्पाची 50 टक्के किंमत म्हणजेच रु. 3552.72 कोटी शेअर करण्यास संमती दिली आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासाठी पुढाकार घेऊन वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. या निर्णयाबद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

बहुचर्चित जालना – जळगाव रेल्वे लाईनचे काम गतिमान पध्दतीने व्हावे यासाठी राज्य शासनाची कायम सकारात्मक भूमिका राहिलेली आहे.या प्रकल्पास एकूण 7105.43 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.त्यापैकी राज्य शासनाचा 50 टक्के हिस्सा म्हणजेच 3552. कोटी रुपये देण्यास राज्य शासनाने संमती दिली आहे.राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एमओआरच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासन 60 दिवसांच्या आत या प्रकल्पासाठी निधी देण्यास तयार आहे.या बाबतचे पत्र वाहतूक आणि बंदरे ( गृह विभाग ) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयास दिले आहे.